बडबड गीत

पावसात सदा

सोसाट्याचा वारा
अन रिमझिम धारा
लगबग पाऊले
पळती भरा भरा

कडकड वीज
अन धावपळ जरा
विजेच्या ढोलाने
अंगी उठतो शहारा

आजीबाई नको म्हणता
न्हेतो सदा गुरांना चराया
आभाळाची काळवंड
सोडून दैवाच्या भरवश्या

गुरांच्या या मेजवानीत
पाऊस झाला चालू
सदा मात्र या विचारात
की यांना मागे कसं घालू

माळरानात टोळी
अन त्या टोळीचा म्होरक्या
आडोसा घेण्यासाठी
त्या टोळीची दुर्दशा

ओली ओली गुरे
अन चिंब चिंब सदा
मोसमाच्या खेळाने
त्यांच्या छातीवर गदा

जोर जोरात पळत
सगळे पोचले ते घरा
आजीबाईचा शब्द
शेवटी ठरलाच खरा

Comments